मनोज जरांगे पाटील यांच्या हरकी लिमगांव येथील सभेची तयारी पूर्ण

0
मनोज जरांगे पाटील यांच्या हरकी लिमगांव येथील सभेची तयारी पूर्ण

दोन लाखांहून अधिक लोकांची बैठक व्यवस्था







लोकाशा न्यूज विवेक कचरे 


राजेगांव :- मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटिल यांच्या हरकी लिमगांव येथील सभेची तयारी पूर्ण झाली आहे. सभेसाठी १५ फूट उंचीचे २० × ३२ असे भव्य व्यासपीठ, १० एलईडी स्क्रीन, दोन लाखांहून अधिक लोकांची बैठक व्यवस्था, गाड्या पार्किंगसाठी वेगवेगळी १६ ठिकाणं आणि मोठे ड्रोन अशी व्यवस्था पूर्ण झाली आहे.
 
  मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरांगे यांच्या हरकी लिमगाव (माऊली फाटा) येथील सभेची जंगी तयारी पूर्ण झाली आहे. अशी माहिती सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी दिली आहे. मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरांगे-पाटील हे आपल्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत.या दौ-याला १ डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आली आहे.  १२ डिसेंबर मंगळवार रोजी सायंकाळी चार वाजता माजलगाव तालुक्यातील हरकी लिमगांव (माऊली फाटा) येथे भव्य अशी समारोप सभा होत आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी सकल मराठा समाज बांधव व मराठा कार्यकर्ते शर्थीचे प्रयत्न करत आहेत. माजलगांव तालुक्यातील सर्व गावात आणि वाड्यावस्त्यांवर पत्रके वाटली गेली आहेत. याशिवाय जागोजागी बॅनर लावले, दुचाकी-चार चाकी वाहनांना स्टिकर लावलेले आहेत, गावागावांत रिक्षातून सभेची माहिती देण्यात येत आहे, मराठा समाजातील तरुणांनी सोशल मीडिया सारख्या समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात या सभेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे.जरांगे पाटील यांची ही  जिल्ह्यातील समारोप सभा असल्याने ती विक्रमी सभा होईल असा संयोजकांचा विश्वास आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे अहवाल सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.

चौकट:-
सभेसाठी मदतीचा ओघ सुरु

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी गावागावातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू आहे. यामध्ये मराठा बांधवांकडून विविध स्वरूपात मदत करण्यात येत आहे, मदतीचा ओघ सुरूचं आहे.
------------
चौकट:-
बौध्द व मुस्लिम बांधवांचा सभेसाठी पाठींबा

संपूर्ण महाराष्ट्र भर जरांगे पाटील यांच्या सभांचा धुमधडाका सुरूच आहे यानिमित्ताने वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देत असून माजलगाव शहरासह ग्रामीण भागातील बौध्द, मुस्लिम बांधवांनी स्वंयम प्रेरणेने पाठिंबा दिला आहे.तसेत जरांगे पाटील यांचा सत्कार बौध्द व मुस्लिम समाजाकडून माजलगाव येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे करण्यात येणार आहे.

चौकट:-
सभेसाठी आलेल्या बांधवांसाठी अल्पउपहाराची व्यवस्था

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या निमित्त येणाऱ्या महिला व बांधवांसाठी चहा, खिचडी,व बिस्किट अशा अल्पोपहाराची तसेच ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शहरासह ग्रामीण भागातील मराठा बांधवांकडून सभेच्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येत आहे.

चौकट:
मनोज जरांगे पाटिल सभेसाठी तगडा पोलिस बंदोबस्त

मनोज रंगे पाटील यांची हरकी लिमगाव येथील होत असलेल्या सभेसाठी पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त करण्यात आलेला आहे तसेच संयोजकाकडून देखील महिला व पुरुष मिळून १२०० स्वयंसेवकाची टीम सज्ज असणार आहे.

चौकट:- 
वाहतूक व्यवस्थितेत फेरबदल

गढी कडून माजलगाव ला जाणारी वाहने गढी - बीड -तेलगांव मार्गे माजलगांव ला जातील,  माजलगांव वरुन जाणारी वाहने परभणी फाटा - तेलगांव -वडवणी मार्गे बीड ला जातील माजलगाव ते छत्रपती संभाजीनगर ला जाणारे वाहने सादोळा आष्टी (जि जालना) परतुर (जि. जालना) मार्गे छत्रपती संभाजी नगरला जातील. वाहतूक व्यवस्था संदर्भात पोलीस प्रशासनाकडून फेरबदल करण्यात आलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)