शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची तहसीलदारांकडे तक्रार
माजलगाव तालुक्यातील केसापुरी येथील जिल्हा परिषद शाळेची विनापरवाना भिंत पाडून या ठिकाणाहून खोदकाम करून पाईपलाईन नेली. यामुळे शाळेच्या भिंतीलाही धोका निर्माण झाला असून यासंदर्भात शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गिता अतुल सोळंके यांनी माजलगाव तहसिलदारांकडे लेखी तक्रार दिली आहे. या गुत्तेदारावर कारवाई करावी अशी मागणी शालेय समिती अध्यक्ष गिता सोळंके यांनी केली आहे.
केसापुरी येथील जिल्हा परिषद शाळेची भिंत पाडून जलजीवन मिशनची पाईपलाईन नेण्याचे काम सुरू आहे. जलजीवन मिशनचे गुत्तेदार यांनी शाळेच्या मुख्याध्यापक किंवा शालेय समितीला न विचारता ही शाळेची भिंत पाडली. दोन खोल्याच्या मधून पाईपलाईनचे काम सुरू असून यामुळे खोल्याच्या भिंतीही तडकल्या. या प्रकारामुळे मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या गुत्तेदाराने शिक्षण विभागाची परवानगी न घेताच शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे. उत्तरेकडील कंपाऊंड वॉलची भिंतही पाडण्याचा त्यांचा डाव असून या पाईपलाईनसाठी शाळेतील ९ झाडे तोडण्यात आली. त्यासाठीही परवानगी घेण्यात आली नाही. या प्रकरणी तहसीलदार यांनी हस्तक्षेप करून संबंधित गुत्तेदारावर कारवाई करून शाळेची नुकसान भरपाई या गुत्तेदाराकडून वसूल करावी व शाळेचे नवीन बांधकाम करून घ्यावे अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गीता अतुल सोळंके यांनी केली आहे.
ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.